गुरुवार, १० जानेवारी, २०१९

गरिबांना आरक्षण

खरपूस • वात्रटिका


« गरिबांना आरक्षण »

आठ लाखांचे उत्पन्नवालाही 
आता 'गरीब' असणार आहे 
रोजगाराची हमी असो वा नसो 
आरक्षणाच्या कक्षेत दिसणार आहे  

उशिराच्या मंजुरीला थोडे
राजकीय रंग आले आहे 
मनमोहक निर्णय घेण्यात 
सरकार दंग झाले आहे

हे सर्व काळाच्या कसोटीवर 
खरंच आता टिकायला हवे 
गरीब-श्रीमंतातील भेद 
लवकरच मिटायला हवे  
• रघुनाथ सोनटक्के

(१० जानेवारी २०१९,  दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ८९)
Vatratika

बुधवार, ९ जानेवारी, २०१९

मंदिरप्रवेशाचा भेद

खरपूस • वात्रटिका

« मंदिरप्रवेशाचा भेद »

'ती' अंतराळात जाऊनसुध्दा
मंदिरात प्रवेश नाकारल्या जातो
समानतेचा बाणा कुठे मग
व्यवहारात बरं वापरल्या जातो?

निवाडा देवूनही दिसत नाही
प्रत्यक्षात भेद केला आहे
पुराणातील विचारांनी अजून
विवेकाला छेद दिला आहे
• रघुनाथ सोनटक्के

(९ जानेवारी २०१९,  दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ८)
११ जानेवारी २०१९ च्या दै. पथदर्शी मधे प्रकाशित 
Vatratika Vatratika

संमेलन आणि वाद

खरपूस • वात्रटिका

« संमेलन आणि वाद »

संमेलन म्हणजे सारस्वतांचा
एकमेकांशी संवाद असतो
प्रत्येकवर्षी काही ना काही
चाखायला थोडा वाद असतो

अक्षरांच्या या व्यवहारात 
भेदाचं राजकारण घुसलं आहे
वादविवादाच्या मिठाने
साहित्याचं 'क्षेत्र'ही नासलं आहे

वाद आणि व्यावसायिकतेपायी
खरा आत्मा हरवला आहे
गेल्यावर्षीप्रमाणे याहीवेळेस
तोच कित्ता गिरवला आहे
• रघुनाथ सोनटक्के (पुणे)

मो. ८८०५७९१९०५



(८ जानेवारी २०१९,  दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ८) 
Vatratika

सोमवार, ७ जानेवारी, २०१९

दप्तराचं ओझं

खरपूस • वात्रटिका

  « दप्तराचं ओझं »
 
  दप्तराच्या ओझ्यासोबतच
अपेक्षांचं ओझंही वाढलं आहे
शिक्षणाच्या बाजारीकरणाने
विद्यार्थ्यांचं कंबरड मोडलं आहे

प्रतिभा, इच्छा अन् कलेला
प्रोत्साहन द्यायला हवं
स्पर्धेत नुसतं धावण्याऐवजी
खरं विद्यामृत प्यायला हवं
• रघुनाथ सोनटक्के

(७ जानेवारी २०१९,  दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ८६)
Vatratika

रविवार, ६ जानेवारी, २०१९

अच्छे दिन

अच्छे दिन
अच्छे दिन यायला अजून 
बाकी वर्षे कैक 
स्वच्छ भारत मोहिम मात्र 
झाली हाय-टेक

आमच्या खात्यांमध्ये भरलं 
आम्हीच 'काळं धन'!
परदेशातलाही मिळेल पैसा 
होता आमचा भ्रम 

महागाई वाढतेय रोज 
दौरे करू द्या भरभर
मग काय निवडणूक
बाकी आहे वर्षभर 

रघुनाथ सोनटक्के 
8805791905

(५ जानेवारी २०१९,  दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ८५) 
Vatratika

शुक्रवार, ४ जानेवारी, २०१९

प्रकरणांचं राजकारण

खरपूस • वात्रटिका

« प्रकरणांचं राजकारण »

त्यांचं आॅगस्टा प्रकरण
तर यांचं राफेल आहे
जनतेचे कान झाले बधीर
ती महागाईने वाकेल आहे

विरोधक रोज आक्रमक
संसद मात्र ठप्प आहे
उत्तर मिळेल या प्रतिक्षेत
जनता सुध्दा गप्प आहे
• रघुनाथ सोनटक्के

(४ जानेवारी २०१९,  दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ८४)

Vatratika

गुरुवार, ३ जानेवारी, २०१९

पॅटर्न

खरपूस • वात्रटिका

« पॅटर्न »

सत्तेसाठी नवेनवे पॅटर्न येतात
हल्ली ते नवे राहिले नाहीत
नितीमुल्यांना हरताळ फासून
निष्ठेचे खरे दुवे राहिले नाहीत

सत्तेचं लोणी पाहून मग
अभद्रांचींही साथ मिळते
पारंपारिक शत्रूत्व गळून
अचानक मैत्रीचा हात मिळते
• रघुनाथ सोनटक्के
(
 जानेवारी २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ८३)


VatratikaVatratika

बुधवार, २ जानेवारी, २०१९

नववर्ष

खरपूस • वात्रटिका

« नववर्ष »

नेहमीप्रमाणे हेही वर्ष
नकळत सरले आहे
उगवेल तेच नववर्षात
जे आपण पेरले आहे

करायचे संकल्प प्रयत्नांसह
सकारात्मक ते साध्य होतील
आडवे येणारे संकटेही
सहज सुटण्यास बाध्य होतील

जगाचा पोशिंदा जगावा
भूकेल्याला मिळावा घास
तेव्हाच होईल सगळ्यांचे
नविन हे वर्ष खासमखास
 • रघुनाथ सोनटक्के

(१ जानेवारी २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ८१)

१ जानेवारी २०१९ च्या प्रीतीसंगम, स्वाभिमानी छावा, डहाणू मित्र मधे प्रकाशित
२ जानेवारी २०१९ च्या दै. पथदर्शी मधे प्रकाशित 

VatratikaRaghunath SontakkeRaghunath Sontakke



सोमवार, ३१ डिसेंबर, २०१८

जाहिरातबाजी

« जाहिरातबाजी »


निवडणूक बघून पक्षांना
आला जाहिरातबाजीचा ऊत
करोडो रुपये खर्चून
दाखवतात विकासाचं भुत

वेळेपेक्षा आधीच निवडणुकीचे
ढग कसे बरसायला लागले
जागोजागी जाहिरातींचे मोठे
फलक झळकायला लागले

प्रचाराचं पिक हंगामा आधीच
मस्त अन् जोमदार आहे
कळेलच थोड्या वर्षांनी
कोण किती दमदार आहे
  • रघुनाथ सोनटक्के
     मो. 8805791905
     ईबुक: https://goo.gl/aY6hVB

 ३१ डिसेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ८०)
Vatratika

शनिवार, २९ डिसेंबर, २०१८

राजकिय पुर्नवसन

« राजकिय पुर्नवसन »

कधी कुणाचं पुर्नवसन होईल
काही सांगता येत नाही
पात्र असुनही वगळल्या जातं
पद मोठं मागता येत नाही

वोटबॅंक बघूनच नेत्याला
मोकळी वाट दिली जाते
वर्षानुवर्षे खर्‍या कार्यकर्त्याला
नेहमीच चाट दिली जाते
  • रघुनाथ सोनटक्के
     मो. 8805791905
     ईबुक: https://goo.gl/aY6hVB

२९ डिसेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ७९)
Vatratika

युती कि सामना

युती कि सामना

युती व्हावी दोघांची यावेळी
दोन्ही नेत्यांची कामना आहे
रणांगणात एकमेकांना रोखने
हाच खरा 'सामना' आहे

कुठे 'देवा'च्या मन कि बात
तर कुठे तडजोडीचा 'वर्षा'व आहे
कधी युतीसाठी कुरघोडी
तर कुठे करायचा बचाव आहे

• रघुनाथ सोनटक्के©
८८०५७९१९०५

डिसेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ७८)
१४ नोव्हेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ४०)
Vatratika

शुक्रवार, २८ डिसेंबर, २०१८

आयाराम-गयाराम

खरपूस • वात्रटिका

« आयाराम-गयाराम »

आधी गेले होते सोडून
ते परत येऊ लागले
स्वगृही येताना पक्षनिष्ठेचा
दाखला देऊ लागले

निवडणूक पाहून लगेच
कसे वारे वाहू लागले
आयाराम नव्या पक्षांचे 
गाणे गाऊ लागले
• रघुनाथ सोनटक्के

  दिवाळी अंक:https://bit.ly/ShabdRasik-2018


( डिसेंबर २०१८ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. )


आश्वासनांचा टेकू

« आश्वासनांचा टेकू »

सभांमध्ये वाट्टेल ते बोलतील
सत्य असेल याची हमी नसते
हव्या तसल्या थापा मारणार्‍या
महाभागांची काही कमी नसते

सत्तेत आल्यावर कळते कि
तो सारा जुमला असतो
याला घ्या कि त्याला घ्या
खोटेपणाचाच मामला असतो

जनतेला आपलंसं करण्यात 
प्रत्येकजणच फ़ेकू आहे 
सत्तेच्या हव्यासापोटी 
आश्वासनांचाच टेकू आहे
• रघुनाथ सोनटक्के
 मो. 8805791905

७ डिसेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. )
Vatratika

गुरुवार, २७ डिसेंबर, २०१८

राजकीय पटल

« राजकीय पटल »

लोकप्रियता सांभाळण्यासाठी 
राजकीय पटल आहे 
कधी असेल शिखरावर 
तर पराभव अटल आहे 

आज त्यांच्या हाती सूत्रे 
म्हणून त्यांना सलाम आहे 
भ्रमात ठेवने जनतेला म्हणजे 
स्वतःच स्वतःचेच गुलाम आहे 

आदेश मानतो म्हणजे मानू नये 
तो आपला चेला आहे 
सत्तासुंदरीमुळेच हातात
हुकमाचा पेला आहे
• रघुनाथ सोनटक्के
 मो. 8805791905

६ डिसेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ६) ६ जानेवारी २०१९ (दै. विदर्भ मतदार)
Vatratika Vatratika

बुधवार, २६ डिसेंबर, २०१८

वाटेकरी

• ख र पु स । वा त्र टि का • 

« वाटेकरी »


यशाला वाटेकरी बघा 
हजारोने मिळतात 
अपयशाला पाहून लोक 
लगेच पळतात 

लोकप्रियतेचा आलेख 
घसरत चालला आहे 
टोमण्यांच्या आडून 
नेतृत्वाला सल्ला आहे 

टिकाव लागेल एवढी 
कुणाची छाती आहे! 
आकांक्षा जोपासण्यासह
थोडीशी भीती आहे

• रघुनाथ सोनटक्के©
मो. 8805791905
५ डिसेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ५)


Vatratika

सोमवार, २४ डिसेंबर, २०१८

निवडणूकीआधी

• ख र पु स । वा त्र टि का • 
« निवडणूकीआधी »


Calligraphy by Raghunath Sontakke

निवडणूकीआधी एकत्र यायला हवं
सार्‍यांनाच वाटू लागते
बाकी उणीदुणी काढण्यात जातात
वेळेवर महत्व पटू लागते

कुणी म्हणतं यांच्यापासुन 
भारत-मुक्ती झाली पाहिजे
आधीच्या मतांना चिकटून राहण्याची
सक्ती झाली पाहिजे

दिशा बदलते वेळोवेळी
बदलतो कसा यांचा 'ट्रॅक'
कधी करतील घुमजाव तर
कधी करतील हायजॅक

• रघुनाथ सोनटक्के©

   मो. 8805791905
ड‍ाऊनलोड ईबुक: https://goo.gl/aY6hVB
'रसिक'चा फेब्रुवारी अंक येथे वाचा: https://goo.gl/RuZBEU
४ डिसेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ४)
Vatratika

रविवार, २३ डिसेंबर, २०१८

अधिवेशन

« अधिवेशन »
अधिवेशन म्हणजे
मांजर-बोक्याचा खेळ आहे
काही दिवस गोंधळाचे
बाकी दोघांकडे वेळच वेळ आहे

डावपेच, कुरघोडी, बहिष्कार
या सार्‍याची खट्टीमिठी भेल आहे
कामकाज किती होईल
अंदाज आमचा पार फेल आहे
• रघुनाथ सोनटक्के
मो. 8805791905
ईबुक: https://goo.gl/aY6hVB

 डिसेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ३)
Vatratika

शुक्रवार, २१ डिसेंबर, २०१८

कांदाफेक

« कांदाफेक »

साहेबांनी सांगितलं आता 
कांदा फेकून मारायला हवा 
पडलेल्या भावाने हतबल
शेतकऱ्याला आता तारायला हवा 

हमीभावाच्या मागणीला 'सदा'
कांद्याची फोडणी दिली जाते 
संताप आणि उद्वेगाला धरून
मुद्द्याची जोडणी केली जाते

वाकतो म्हणून शेतकऱ्यालाच 
नेहमीच वाकवल्या जाते 
हमीभावाच्या गाजराने
प्रत्येकाकडून नागवल्या जाते 
  • रघुनाथ सोनटक्के (पुणे)
मो. 8805791905
 डिसेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. )

Vatratika


गुरुवार, २० डिसेंबर, २०१८

निकषांचा ताप

निकषांचा ताप
   
शेतकर्‍याचं कर्ज
करतो म्हणतात माफ
मागे कसा आहे मग
आत्महत्यांचा ताप

वरकरणी सरसकट आहे
छुपा निकषांचा चाप
शेतकर्‍याचं करू म्हणे भलं 
आहोत विकासाचे बाप

वादे केलेत पुर्ण आम्ही
नाही नुसती मारली थाप
सामना होईल तेव्हा होईल
तोवर करू प्रचार वारेमाप

  • रघुनाथ सोनटक्के (पुणे)
मो. 8805791905
(रोज दै. 'युवाछत्रपती'मधे प्रकाशित)

२० डिसेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. )
Vatratika

बुधवार, १९ डिसेंबर, २०१८

श्रेयवादाची लढाई

खरपूस • वात्रटिका

« श्रेयवादाची लढाई »

इलेक्शनच्या नांदीआधी
श्रेयवादाची लढाई असते
एकाच कामासाठी कधीकधी
दोघांचीही बढाई असते

भूमीपुजन करते कुणी
उद्घाटन कुणाकडून उरकल्या जाते
श्रेयवादाच्या नादात का होईना
फाईल थोडी सरकल्या जाते

  • रघुनाथ सोनटक्के (पुणे)
(रोज दै. 'युवाछत्रपती'मधे प्रकाशित)

 डिसेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ७०)
Vatratika