बुधवार, ३० जानेवारी, २०१९

गरिबी हटाव

खरपूस • वात्रटिका

   « गरिबी हटाव »
प्रत्येकजणाला वाटते 
आपल्याला गरिबीची लागन आहे
श्रीमंत होण्यासाठी सांगा
कोणतं निघालं साबण आहे!

प्रत्येकातल्या 'गरिबी'ला
वचननाम्यात हळूच साद असते
काम झालं कि एकदाचं
हेतुपूरस्पर मग ती बाद असते

आवाज गरिबाचा कुणी ऐकेना 
नेहमीच तो मागत असतो
प्रत्येकजण कैवारी असल्यागत
छातीठोकपणे वागत असतो
• रघुनाथ सोनटक्के

( जानेवारी २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १०३)
Vatratika

राजकारण

खरपूस • वात्रटिका

« राजकारण »
कुणाचा संघर्ष आहे
कुणाची यात्रा आहे
वेगवेगळ्या प्रवाहांची
राजकारण ही जत्रा आहे

रंगारंगाच्या पताका, झेंडे
वेगवेगळे फेटे आहेत
सम-विषम, डावे-उजवे
स्वंयघोषीत नेते आहेत

भ्रमित करणारे मुद्दे अन्
कार्यकर्त्यांची फौज आहे
अस्मितेचा चाबूक हाणत
नेतेमंडळीची मौज आहे
• रघुनाथ सोनटक्के

(३० जानेवारी २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १०२)
३० जानेवारी २०१९ च्या दै. पथदर्शी, प्रीतीसंगम, मराठवाडा संचार, वाचकमंच, बलशाली भारत मधे प्रकाशित 


VatratikaVatratikaVatratikaVatratikaVatratika

मंगळवार, २९ जानेवारी, २०१९

सौदा

« सौदा »

एका एका जागेसाठी म्हणे
घासघीस अन् सौदा आहे
कधी तडजोड होते तर 
कधी पेच नवा पैदा आहे

भिजत राहू द्यावं घोगंडं
कुणाचाच फायदा नाही
शत्रू तर नाही म्हणायला
मित्रत्वाचाही वायदा नाही

पावलं पडतात दिशेने
पण मधेच घोडं अडतं
सगळ्याचं तिकडेच लक्ष
लग्न यांच कधी जुळतं!

• रघुनाथ सोनटक्के

( जानेवारी २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १०२)
 फेब्रुवारी २०१९ च्या मराठवाडा संचार मधे प्रकाशित

Vatratika Vatratika

सोमवार, २८ जानेवारी, २०१९

आठवण

« आठवण »

देशासाठी आपल्या दिली 
आहूती ज्या थोरांनी
आठवण ठेवावी त्यांची
आजकालच्या पोरांनी

हिंसा, अहिंसेच्या बळावर
काहींना फाशी, कुणी दिले प्राण
सलाम त्यांना आमचा
गाऊन आपले राष्ट्रगाण

तिरंगा फडकत राहू दे
उंच गगनी दिमाखात
शान वाढवू आम्ही त्याची
राहून एकतेच्या सुत्रात
• रघुनाथ सोनटक्के


(२८ जानेवारी २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १०१)
Vatratika


रविवार, २७ जानेवारी, २०१९

देशभक्ती

« देशभक्ती  »


Calligraphy by Raghunath Sontakke


स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे
आता उरलेत कुठे भक्त
आपआपसात भांडून
होईल का देश सशक्त

दहशतवाद, गरिबी, अन् महागाई
कुणी देतो अस्मितेच्या हाका
राजकारणासाठी जाती-धर्म
हाच तर आहे खरा धोका

तिरंग‍ा छातीला लावणारे
नेहमीच आपले झेंडे मिरवतात
प्रजासत्ताक अन् स्वातंत्र्यदिन सोडून
बाकी तोच कित्ता गिरवतात
   • रघुनाथ सोनटक्के
     मो. 8805791905
ईबुक: https://goo.gl/aY6hVB

१२ ऑगस्ट २०१८ च्या दै. जनशक्ती (मुंबई) मधे प्रकाशित
२६ जानेवारी २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १००
२६ जानेवारी २०१९ च्या दै. पथदर्शी, औरंगाबाद केसरी, व दै. मराठवाडा संचार मधे प्रकाशित  


Janashakti Mumbai Vatratika  Vatratika
VatratikaVatratika

शुक्रवार, २५ जानेवारी, २०१९

घराणेशाही

खरपूस • वात्रटिका

« घराणेशाही »
हातात हात घालून
भावा-बहिणीचा संग आहे
उभारी घ्यायला पक्ष
घराणेशाहीतच दंग आहे

आजोबा, पणजोबा
आणि आता नात आहे
दशकानुदशके पकडलेली 
नेहमीचीच ही वाट आहे

मु्द्दे घेवून भांडायला
कार्यकर्ताही 'प्रिय' आहे
'सोनिया'चा दिवस पाहण्यास
सत्ता एकमात्र ध्येय आहे
• रघुनाथ सोनटक्के

(५ जानेवारी २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. )
Vatratika

गुरुवार, २४ जानेवारी, २०१९

वासनेचे पुजारी

वासनेचे पुजारी

फाशीच द्या त्यांना आता
जे आहेत वासनेचे 'पुजारी'
गोळ्या घाला त्या श्वापदांना
जे घालतात माणसांच्या विजारी

वाळीत टाका त्या प्रवृतींना
जे समजतात नुसतं खेळणं
भावना, जिवाशी प्रतारणा
षंढ जे जाणतात फक्त पळणं

• रघुनाथ सोनटक्के

(३ जानेवारी २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. )
Vatratika

मंगळवार, २२ जानेवारी, २०१९

जपुन वापरा पाणी

जपुन वापरा पाणी 
असलं मुबलक जरी
जपुन वापरा पाणी
पाण्यासाठी वणवण करताना 
दिसु नये कुणी

'पाणी अडवा, पाणी जिरवा'
करू नका नुसती 'म्हण'
खोल जातंय दिवसेदिवस
जबाबदार अ‍ाहोत प्रत्येकजण

कार धुणे, नळ खुले
असा अपव्यय करणे टाळा
पाण्यासाठी होतात भांडणे
सोडवावीत किती वेळा

मुलभुत गरज आपली
सरकारने सोडवावी जोमाने
करू एकमेंका सहकार्य 
जगु भारतीय म्हणुन मानाने

• रघुनाथ सोनटक्के


दि  १ मे  २०१८  आणि ७,  ऑगस्ट २०१८ च्या 'युवा छत्रपती' (वात्रटिका क्रं. ९६) या लातूरच्या दैनिकात प्रकाशित
२२ जानेवारी २०१९ च्या दै. औरंगाबाद केसरी, प्रीतीसंगम मधे प्रकाशित
२३ जानेवारी २०१९ च्या दै. डहाणू मित्र मधे प्रकाशित
२४ जानेवारी २०१९ च्या दै. बलशाली भारत (अहमदनगर) मधे प्रकाशित
२५ जानेवारी २०१९ च्या दै. पथदर्शी (धुळे) मधे प्रकाशित



 Raghunath Sontakke Vatratika

Vatratika Vatratika Vatratika



सोमवार, २१ जानेवारी, २०१९

आघाडीचा जश्न

« आघाडीचा जश्न »

निवडणूकपूर्व सगळ्यांकडून 
आघाडीचा जश्न आहे
नंतर त्यातले किती उरतील
हाच खरा प्रश्न आहे!

बळ एकवटून यांना फक्त
जागा जोडायच्या आहेत
कुणी आहे चिंतेत अजूनही
कुणाला किती सोडायच्या हेत!

• रघुनाथ सोनटक्के (पुणे)  मो. ८८०५७९१९०५
(१ जानेवारी २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ५ )
Vatratika

रविवार, २० जानेवारी, २०१९

अंधश्रद्धेचा विळखा

खरपूस • वात्रटिका

    « अंधश्रद्धेचा विळखा »
विज्ञानयुगातही भारतीयांना
अंधश्रद्धेचा विळखा आहे
धर्माला चिकटणार्‍यांना
धंदा करणार्‍यांचा पुळका आहे

स्वार्थासाठी लूट, नरबळी 
विधी हा बघा कसला आहे
भोळ्या लोकांना भुलवणार्‍यांचा
मेंदू पुरता नासला आहे
• रघुनाथ सोनटक्के

(१९ जानेवारी २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ५६)
Vatratika

शनिवार, १९ जानेवारी, २०१९

चमकोगिरी

खरपूस • वात्रटिका

« चमकोगिरी »
इलेक्शनच्या नुसत्य‍ा वार्‍याने 
नवे पंख फुटू लागतात
भावी नेत्य‍ाच्या चेल्यांकडून
नको त्या पुड्या सुटू लागतात

पैसा, गुंडगिरीचा आजकाल
जिकडेतिकडे हैदोस आहे
गल्लीतल्या दादालाही हल्ली
नेतागिरीची भारी हौस आहे

चमकोगिरी आणि चमच्यांमुळे
असल्या नेत्यांना बळ मिळते
त्यांनाही कळायला हवेच
कामाशिवाय कुठे फळ मिळते
• रघुनाथ सोनटक्के (पुणे)
  मो. ८८०५७९१९०५

( जानेवारी २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं.७८)
Vatratika

शुक्रवार, १८ जानेवारी, २०१९

जोडतोड

खरपूस • वात्रटिका

    « जोडतोड »
फाटाफुटीचं राजकारण
परत एकदा शिजलं आहे
सुरक्षित सरकार पाडायला
नाराजांना खेचलं आहे

विरोधकांकडून स्वार्थी आमदार 
बरोबर ताडले जातात
सुत जुळवायला काही करून
आकडे असे जोडले जातात

वाकडं त्यांच्याशी म्हणून 
स्थैर्य यांना बरं वाटत नाही
काठावरचं सरकारही
अशा तोट्यांनी खरं वाटत नाही
• रघुनाथ सोनटक्के

( १७ जानेवारी २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं.९५)
( १७ जानेवारी २०१९, दै. प्रीतीसंगम, वात्रटिका क्रं.४)
Vatratika Vatratika

बुधवार, १६ जानेवारी, २०१९

बुआ भतीजा


« बुआ भतीजा »

हाताला ठेवून बाजूला
हत्ती सायकलवर बसला आहे
कमळ फुलण्याचा रस्ता
अडवून गालात हसला आहे

दिल्ली गाठायला आता
सोयीचा रस्ता राहिला नाही
बुवा भतीजा पहिल्यासारखा
खिलाडी सस्ता राहिला नाही

राजकारणाच्या पटावर
कायम कुणी शत्रू नसतो
आज जे दिसतं त्याचा
भरवसा उद्या मात्र नसतो

 • रघुनाथ सोनटक्के
     मो. ८८०५७९१९०५


    (१६ जानेवारी २०१९,  दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ९)
 (१६ जानेवारी २०१९,  दै. प्रीतीसंगम , वात्रटिका क्रं. ३)
VatratikaVatratika

मंगळवार, १५ जानेवारी, २०१९

पक्षबदलू


« पक्षबदलू »

निवडणूकीच्या तोंडावर
पक्षबदलूंची चलती आहे
निष्ठावन कार्यकर्ता डावलणे
हिच पक्षांची गलती आहे

तो निवडून येईलच
हा पक्षाचा होरा असतो
बळ वाढविण्याच्या नादात
खर्‍या कार्यकर्त्यावर सुरा असतो

 • रघुनाथ सोनटक्के
     मो. ८८०५७९१९०५


१५ जानेवारी २०१९,  दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ९
२८ जानेवारी २०१९ च्या दै. पथदर्शी मधे प्रकाशित

Vatratika Vatratika

सोमवार, १४ जानेवारी, २०१९

युतीचा गोंधळ

« युतीचा गोंधळ »

'खड्डयात गेली युती'
आता जनतेनंही मानलं आहे
भिजत घोंगडं ठेवून बाणाने
धनुष्य खुप ताणलं आहे

एकाच घरात राहून कितीदा
भांड्याला भांड लागलं आहे
त्रागुन कमळाबाईने मनात 
भलतच काही आणलं आहे

थोड्याच दिवसात गाडी
दिलजमाईकडे वळणार आहे
भांडून एवढं काय साध्य केलं
नक्की मग कळणार आहे
• रघुनाथ सोनटक्के
     मो. ८८०५७९१९०५
    (१४ जानेवारी २०१९,  दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ९)
Vatratika

रविवार, १३ जानेवारी, २०१९

निवडणूकीची वरात


निवडणूकीची वरात 

मैदान पाहून जवळ 
दहा हत्तीचं बळ आलं आहे 
एकमेकांच्या संमतीने 
मनोमिलनाचं स्थळ आलं आहे 

कुणी घेईल घटस्फोट 
कुणाचं होईल मंगल 
लवकरच पाहायला मिळेल 
पहेलवानांची दंगल 

हरेकाला वाटतं 
जनता आम्हालाच वरंल 
कितीही केली धूम जरी
विजेता कामानेच ठरंल
• रघुनाथ सोनटक्के (पुणे)
    मो. ८८०५७९१९०५

(१२ जानेवारी २०१९,  दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ९१)
Vatratika

शनिवार, १२ जानेवारी, २०१९

राजकिय संसार

खरपूस • वात्रटिका

« राजकिय संसार »

आघाड्या आणि युत्यांचा
हरेक संसार थाटतो आहे
बळानुसार एकमेकांमधे
सोयीच्या जागा वाटतो आहे

शक्यता आणि बळाची
चाललेली ही लढत आहे
शह, कटशहाने कुणाला
मिळते थोडी बढत आहे

आता आहेत एकत्र म्हणून
'समविचारी' वाटू लागतात
सत्तेसाठी नंतर दुसर्‍याचे
पायही हे चाटू लागतात

• रघुनाथ सोनटक्के (पुणे)
    मो. ८८०५७९१९०५

( जानेवारी २०१९,  दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ९०)
१२ फेब्रुवारी २०१९ च्या दै. पथदर्शी मधे प्रकाशित
Vatratika Vatratika