बुधवार, ३० ऑक्टोबर, २०१९

महापेच

• महापेच •

चालू आहे सध्या
सत्तेची रस्सीखेच
स्पष्ट असलं तरी
पडलाय 'महा'पेच

एक एकीकडे तर
दुसरा दुसरीकडे खेचतो आहे
लग्न झालं सुखाने
मात्र हनिमून टोचतो आहे

• रघुनाथ सोनटक्के

सत्तेचं लोणी


• सत्तेचं लोणी •
भांडायला लागले आहेत
चाखण्या सत्तेचं लोणी
विसर पडला जनतेचा
ऐकायला तयार नाही कुणी

आकड्यांच्या बळावर
चालू आहे सत्तेचा खेळ
असाच वाया घालवतील
नको तेवढा वेळ

पाठिंबा, सत्तेचा वाटा
चालत राहिल काही दिवस खेळ
जनमत गेलं खड्ड्यात
हा तर लोभ, अहंकाराचा मेळ

• रघुनाथ सोनटक्के

मंगळवार, २४ सप्टेंबर, २०१९

भिजत घोंगडं


  भिजत घोंगडं
युतीचं पडलं भिजत घोंगडं
राणे वाटेवर थांबले आहेत
आज-उद्या घोषणा म्हणता
त्यांचेही प्रवेश लांबले आहेत

त्यांची बार्गेनिंग चालू आहे
काही काठावर आहेत
सत्तेचं पाणी प्यायला
पक्षप्रवेशाच्या पथावर आहे
• रघुनाथ सोनटक्के
 

सत्तेची उब

खरपूस • वात्रटिका

सत्तेची उब
सोडून गेले बरेच नेते
राहिले फक्त मावळे
फांदी बदलून बसलेत
काळे ते कावळे

आज इथे, तर उद्या तिथे
घर त्यांचं फिरत आहे
त्यांच्या सत्तेच्या उबेपायी
कार्यकर्ताच मरत आहे
• रघुनाथ सोनटक्के

सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९

लाडीगोडी

आधी फोडाफोडी झाली
आता जागांची सोडासोडी आहे
आधी काढले उणीदुणी
आता सत्येसाठी लाडीगोडी आहे

शुक्रवार, २० सप्टेंबर, २०१९

भावाचा बळी

भावाचा बळी

अल्पमतात चालवलं सरकार
मित्रालाच कोपरखळी आहे
महत्वाकांक्षा आणि स्वबळाने
भावाचाच जातोय बळी आहे

जुळलं असं वाटलं तरी
आतून लपवली सुरी आहे
एकदा थेट शत्रू परवडला
हि गोष्ट तेवढीच खरी आहे
• रघुनाथ सोनटक्के

मंगळवार, १० सप्टेंबर, २०१९

चांद्रयान २

खरपूस • वात्रटिका

  • चांद्रयान २ •

भारताचे चांद्रयान मोहिमने
एक पाऊल पुढे पडते आहे
जे केले आहे प्रयत्नपूर्वक
ते चांगलेच घडते आहे

यश मिळेलच प्रत्येकवेळी
याची नेहमी हमी नसते
आशाआकांक्षा जागृत असल्या कि
प्रयोगांचीही कमी नसते

आधीच मंगळमोहिमेने
इतिहास आपण रचला आहे
थोड्याशा अपयशाने कुठे
भारतीय हा खचला आहे?

• रघुनाथ सोनटक्के

शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०१९

मंदीच्या झळा

  • मंदीच्या झळा •

बसत अाहेत मंदीच्या
जरी दाहकतेने झळा
तोंड दाबून सोसाव्यात
महागाईच्या कळा

सेंसेक्स कोसळला
रूपयाही घसरला आहे
मंदीची आली लाट
विकासही ओसरला आहे

• रघुनाथ सोनटक्के


(दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २७७)
शब्दरसिकचा दिवाळी अंक येथे बघा:
http://bit.ly/ShabdRasik-2019

रानूचा गळा

खरपूस • वात्रटिका

  • रानूचा गळा•

यशाची पायरी चढली
मंडलची ती रानू
पोहचू शकले नाहीत जीथे
भले गळा तानू तानू

कंगाल असलो कि आप्तही
कायम ठेवतात दुरी
पैसा, प्रसिद्धीसाठी मात्र
गळ्यात पडतात पोरी

• रघुनाथ सोनटक्के

(दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २७६)

बुधवार, ४ सप्टेंबर, २०१९

मनाचे राजे

खरपूस • वात्रटिका

     • मनाचे राजे •
कुणी कुठे वाटेवर आहे
कुणी लागला आहे गळाला
काल म्हणत होता एकनिष्ठ
आज कसा काय हो पळाला!

सत्तेकडे धाव सगळ्यांची
कुणी आपल्या मनाचे राजे
कुणी घेते बांधून बंधन
कमळ होतेय आणखी ताजे

• रघुनाथ सोनटक्के

(दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २७४)

शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०१९

स्वाभिमान

खरपूस • वात्रटिका
 
स्वाभिमान
टिकून-टिकून किती दिवस
स्वाभिमान टिकणार आहे
पोराबाळांसकट तो आता
म्हणे पक्षही विकणार आहे

सत्ताप्राप्ती हेच ध्येय
आणि तेच धोरण असते
कार्यकर्त्यांची इच्छा सांगणे
फक्त तेवढंच कारण असते
• रघुनाथ सोनटक्के

(३१ ऑगस्ट २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २७)

सोशलमिडीया

खरपूस • वात्रटिका
 
सोशलमिडिया
सोशलमेडियाच्या झोताने
येतात लोक उजेडात
कुणी होतो बदनाम तर
कुणी स्टार रातोरात

जाहिरातीच्या या जगतात
प्रसिद्धी रोज हवी असते
रोज घडणारी गोष्टही
कधी खुप नवी असते

दुधारी हे शस्त्र आहे
वापरणार्‍यावर ठरतं
कधी उगीच त्रासदायक
तर कधी असरदार ठरतं
• रघुनाथ सोनटक्के

(२८ ऑगस्ट २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २७०)

गुरुवार, २९ ऑगस्ट, २०१९

मानबिंदू

खरपूस • वात्रटिका

मानबिंदू

बॅडमिंटचं अजिंक्य
जिंकली आहे सिंधू
स्थापित केला भारताने
तिथंही मानबिंदू
• रघुनाथ सोनटक्के

(२ऑगस्ट २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २६९)

बुधवार, २८ ऑगस्ट, २०१९

आवकजावक

खरपूस • वात्रटिका

   • आवकजावक •
पक्षापक्षात आवकजावक
खुप मोठी वाढली आहे
प्रलोभनांच्या चुंबकाने
जुनी धेंडही ओढली आहे

पहिल्यासारखा पक्षनेतृत्वाचा
धाक उरला नाही
जनतेला बांधील असणारा
खाक उरला नाही

• रघुनाथ सोनटक्के

(२८ ऑगस्ट २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २६८)
 

मंगळवार, २७ ऑगस्ट, २०१९

मंदीचा फटका

खरपूस • वात्रटिका

• मंदीचा फटका •
सर्वसामान्यालाच बसतो आहे
मंदीचा दाहक फटका
उद्योग-व्यवसाय मोजताहेत
काही शेवटच्या घटका

कंपन्याही करताहेत
नोकरांची मोठी कपात
भरडल्या जातो सामान्य
काही आहेत सुपात

• रघुनाथ सोनटक्के
शब्दरसिकचा दिवाळी अंक येथे बघा:http://bit.ly/ShabdRasik-2018

(२ ऑगस्ट २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २६७)
 

शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१९

भ्रष्टाचारी नेता

खरपूस • वात्रटिका

• भ्रष्टाचारी नेता •
पदाचा फायदा घेऊन
करे भ्रष्टाचाराचा खेळ
कधीतरी येतेच मग
आतमधे जायची वेळ

भ्रष्टाचारी सापांचा अशा
पडतो आहे देशाला विळखा
समर्थन करणार्‍या पक्षांना
येतो तरी किती मोठा पुळका!

• रघुनाथ सोनटक्के

(२३ ऑगस्ट २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २६५)

गुरुवार, २२ ऑगस्ट, २०१९

जत्रा

खरपूस • वात्रटिका
« जत्रा »
कुणाला हवा आशिर्वाद
कुणाची वेगळीच जत्रा
अशा मतलबी राजकारणाचा
जास्तच आहे खतरा
• रघुनाथ सोनटक्के
(दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १६४)

बुधवार, २१ ऑगस्ट, २०१९

विरोधकांचं दमन

खरपूस • वात्रटिका
  • विरोधकांचं दमन •
राजकारण रंगत चाललं
कुणामागे लागली ईडी आहे
संस्थाचा गैरवापर करण्याची
सवय काय आजची थोडी आहे!

सत्ताधार्‍याकंडून हरतर्‍हेने
विरोधकांचं दमन असते
सत्तेला शहाणपण सांगणे म्हणजे
पालथ्या घड्याला नमन असते

• रघुनाथ सोनटक्के

(२१ ऑगस्ट २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २६३)
 

शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०१९

पुराचा वेढा

खरपूस • वात्रटिका
« पुराचा वेढा »
पुरानं वेढलं आहे
कोल्हापूर आणि सांगली
मदतकार्यात प्रशासन थीटं
अब्रु वेशीवरच टांगली

खायला हवं अन्न-पाणी
पोहचायला हव्यात बोटी
समाजसेवी गेले धाऊन
यंत्रना पडत आहे थीटी
• रघुनाथ सोनटक्के
(दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २५८)
शब्दरसिकचा दिवाळी अंक येथे बघा:http://bit.ly/ShabdRasik-2018

गुरुवार, ८ ऑगस्ट, २०१९

पुराची विपदा

पुराची विपदा

जिथेजिथे बिकटस्थिती
साचलेले पाणी आणि पूर
संकटात धावून लगेच
करा लोकांची विपदा दूर

कठिण प्रसंगी अशा
मदतीला धावले पाहिजे
एकमेका सहाय्य करण्या
दोन हात लावले पाहिजे

पूर, भूकंप आदी विपदा
म्हणजे कठीण घटका असते
माणुसकी दाखवली तरच
संकटातून सुटका असते

• रघुनाथ सोनटक्के
ब्लाॅग : https://vatratika.blogspot.in

 (८ ऑगस्ट २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २५६) 
Vatratika, Raghunath Sontakke