मंगळवार, २८ जानेवारी, २०२०

मार्केटिंग

मार्केटींग
रंग बदलतात नेते
जसे रंगबदलू सरडे
मार्केटींग सुरू असते
जड करायला पारडे

फडकत आहेत पताका
आणि वेगवेगळे झेंडे
प्रचाराला हवे असतात
फक्त कार्यकर्त्यांचे लोंढे
• रघुनाथ सोनटक्के

Raghunath Sontakke

निवडणूकीचे मुद्दे

निवडणूकीचे मुद्दे
मुद्दे असायला हवेत
रस्ते, पाणी आणि बिजली
काही करतात मात्र
जाती-धर्माने खुजली

विकासाचा मुद्दाही बरं
होऊन जातो आहे आम
भल्याभल्यांना फुटतो मग
त्यापायी नको तेवढा घाम

संभ्रम आणि संशयाचा
आहे
'आम' जनतेला शाप
खेचले जातात लोक मात्र
विकासाकडे आपो'आप'

• रघुनाथ सोनटक्के

Raghunath Sontakke

गुरुवार, २३ जानेवारी, २०२०

महापुरूषांचा वापर



महापुरूषांचा वापर
राजकारणासाठी होतोय
महापुरूषांचा वापर
राजकारणी पांघरतात
अस्मितेची लोकर

स्वार्थाची पोळी भाजणे
हाच त्यांचा मोका असतो
भावनेच्या आहारी जाणे
जनतेसाठी धोका असतो

जातीधर्मानुसार महापुरूष
परस्पर यांनी वाटले आहेत
 
काहींनी तर त्यांच्या नावाने
दुकानेही आपले थाटले आहेत

• रघुनाथ सोनटक्के

Raghunath Sontakke

वादाचा भडका

वादाचा भडका
काहीजण देत असतात
उगीच वादाला तडका
अस्मितेला चेतवून मग
उडत राहतो भडका

इकडून आणि तिकडूनही
होत राहतात वार
भडक आणि उत्साही यात
पुढे असतात फार

शब्दाने शब्द वाढतो
उत्तरही धडकत असते
साध्य काहीच न होता
वाद मात्र भडकत असते

• रघुनाथ सोनटक्के

सोमवार, १३ जानेवारी, २०२०

तुलना

तुलना
तुलना केली शिवरायाशी
त्यांनी भक्तीच्या नादात
व्यक्तीपुजेपायी त्यांचं
पुस्तक आलं वादात

गाठू शकणार नाहीच
कुणी शिवरायांची उंची
स्तुतीसुमने उधळणे
सवय आहे काहींची
रघुनाथ सोनटक्के

मंगळवार, ७ जानेवारी, २०२०

बदल

बदल
बदल हा निसर्गनियम
सगळ्यांना पटत असतो
काही वर्षांनी आपला झेंडाही
जुना जुना वाटत असतो

सोयीस्कर मुद्द्यासोबत
नवे मुद्देही जोडले जातात
काहींना बासनात ठेऊन
काही मुद्दे गाडले जातात

रघुनाथ सोनटक्के

शुक्रवार, ३ जानेवारी, २०२०

खातेवाटपाचा घोळ

खातेवाटपाचा घोळ

विस्तारानंतर दिसून आला
काहींचा नाराजीचा सुर
तडजोडीच्या राजकारणात
आलाय इच्छुकांचा पूर

खातेवाटपात चाललाय
नको तेवढा घोळ
हिशेब काही लागेना
चालली आकडेमोड

सुसाट सुटला बाण
हाताला हवा पुरेसा वाटा
हवी तशी चक्रे फिरवतोय
घड्याळाचा काटा

• रघुनाथ सोनटक्के