गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०१९

औटघटकेचा संसार

औटघटकेचा संसार

दाखवुन मोठा हिसका
दादा झाले फरार
फाईल साफ करण्यापुरता
होता त्यांचा करार

सत्तेच्या लालसेने 
फसली कमळाबाई
पहाटे-पहाटेच होती
तिला लग्नाची घाई

उभ्या महाराष्ट्राला दाखवुन 
काका-पुतण्याचा वाद
अवघ्या तासातच केला
संसार त्यांचा बाद
• रघुनाथ सोनटक्के

बुधवार, २७ नोव्हेंबर, २०१९

अतरंगी सर्कस

अतरंगी सर्कस

कधी होतो एक वरचढ
आणि दुसरा लगेच खाली
महाराष्ट्राच्या राजकारणाची
अतरंगी ही सर्कस झाली

क्षणात पलटते बाजी
कुणी टाकतो फासा
रात्रीत खेळ चालल्यावर
दिवसा होणारच हसा!

पैसा आणि सत्तेचा
असतो काहींना माज
कायद्याच्या रेट्याने मग
उतरवली जाते खाज

कोण खरा चाणक्य
कुणाची कुटील निती
खर्‍याला वाटते नसते
कितीही संकटाची भीती
रघुनाथ सोनटक्के

सोमवार, २५ नोव्हेंबर, २०१९

सत्तेसाठी आटापिटा


सत्तेसाठी आटापिटा
प्रत्येकाचा सत्तेसाठी आटापिटा
आणि खोटाखोटा जुमला आहे
धावपळ पाहून राजकारण्यांची
अख्खा महाराष्ट्र दमला आहे

ऐकमेकांची तंगडी खेचण्यात
सारेच आता दंग आहेत
रोज बघावेत तमाशे यांचे
किती वेगवेगळे रंग आहेत

धड कुणाचंच जुळेना
शेतकर्‍याचा नाही कुणी वाली
यांनी मात्र पांघरल्या आहेत
चर्चा, वाद आणि बैठकांच्या झुली
• रघुनाथ सोनटक्के

गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०१९

चर्चा बैठका

चर्चा बैठका
सरकारला मुहुर्त मिळेना
शेतकर्‍याचा नाही वाली
यांनी मात्र पांघरल्यात
चर्चा, बैठकांच्या झुली
रघुनाथ सोनटक्के

शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०१९

सत्तेची वाटणी


• सत्तेची वाटणी •

वैचारिक वादांची
चालू आहे छाटणी
समन्वयाने हवी आहे
त्यांना समान वाटणी

विकास आणि समन्वयाने
भरू द्या कारभाराचे तळे
जनतेसाठीच एकत्र बसा
नंतर मग काढू नका गळे

• रघुनाथ सोनटक्के

मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०१९

सत्ताकारण

सत्ताकारण
एकदाचं जुळलं बघा
सत्तेचं अनोखं समिकरण
कलाटणी देऊन बदललं
महाराष्ट्राचं हे राजकारण

अहंकार आणि लबाडीचं
दर्शन झालं अाहे मोठं
दोस्तीच्या आडं झाकलेलं
उघडं पडलं खोटं

शेवटी प्रत्येकासाठी 
सत्ता हेच कारण आहे
सत्ताधार्‍यांचाच विजय
सामान्याचं मरण आहे
रघुनाथ सोनटक्के

शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०१९

दावा आणि हेका

दावा आणि  हेका
इकडून आणि तिकडूनही
आहे सत्तास्थापनेचा दावा
मुख्यमंत्री मात्र आपलाच
दोघांना काही करून हवा

घड्याळ करते टिकटिक
पुढे यायला कचरतो हात
पत्रपरिषदेने फटाक्यांना
रोजच लावली जाते वात
रघुनाथ सोनटक्के

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९

तिढा

तिढा
मतदान करून झालं
आता सत्तेचा तिढा आहे
वाली नसलेल्या जनतेला
आणखी एक पिडा आहे

वाटणीपायी भांडण 
समजुतदारपणा थोडा आहे
दोस्तीदोस्तीतच लावला
ऐकमेकांना घोडा आहे
• रघुनाथ सोनटक्के